पुणे : अवघ्या ३० सेकंदांत दुचाकी लंपास करणारा सराईत चोर गजाआड; १३ मोटारसायकली जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे शहर आणि परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत सराईत चोरट्याला अटक केली आहे. भरधाव वेगात दुचाकी चालवत अवघ्या ३० सेकंदांत हँडल लॉक तोडून वाहन पळवणाऱ्या या आरोपीकडून पोलिसांनी तब्बल १३ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
महाळुंगे एमआयडीसी परिसरात सातत्याने दुचाकी चोरीच्या तक्रारी दाखल होत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. दरम्यान, पोलीस कर्मचारी शुभम खंडागळे यांना गुप्त बातमीदारामार्फत निलेश मंडलिक हा दुचाकी चोरीतील संशयित आरोपी चाकण येथील आंबेठाण चौक परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून निलेश मंडलिक याला अटक केली. चौकशीत निलेशने औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. तो अत्यंत सराईत गुन्हेगार असून, अवघ्या ३० सेकंदांत कोणत्याही दुचाकीचे हँडल लॉक तोडून वाहन पळवून नेत असल्याचे तपासात उघड झाले आहे. नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पोलिसांनी या चोरीच्या पद्धतीचा प्रात्यक्षिक व्हिडिओही तयार केला आहे.
या प्रकरणात निलेशचा साथीदार संदीप सोनवणे यालाही अटक करण्यात आली आहे. चोरी केलेल्या दुचाकी निलेशकडून घेऊन संदीप त्या कमी किमतीत विक्री करत असे आणि मिळालेली रक्कम दोघेही वाटून घेत असत. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ५ लाख ५० हजार रुपये किमतीच्या १३ दुचाकी जप्त केल्या आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी या कारवाईची माहिती देताना नागरिकांनी दुचाकी सुरक्षित ठिकाणी किंवा अधिकृत पार्किंगमध्येच उभ्या कराव्यात, असे आवाहन केले आहे.