परदेशी शिक्षणाच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; चारकोप पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरोधात गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : परदेशात उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पाठवण्याचे आमिष दाखवून पालक व विद्यार्थ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. चारकोप परिसरातील करिअर अँड ऑप्शन्स सर्व्हिस लिमिटेड या एजन्सीविरोधात चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एजन्सीचे मालक स्टेला मेहता आणि राकेश मेहता हे मुख्य आरोपी आहेत.
डिसेंबर महिन्यात या एजन्सीने परदेशी शिक्षणाची प्रक्रिया, विद्यापीठ प्रवेश आणि व्हिसा मिळवून देण्याचे आश्वासन देत पालकांकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम उकळल्याचा आरोप आहे. सुरुवातीला १३ तक्रारदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र तपासादरम्यान तक्रारदारांची संख्या वाढून १९ झाली असून, फसवणुकीची रक्कमही वाढली आहे. आधी पावणे दोन कोटी रुपयांची असलेली रक्कम आता सुमारे २ कोटी ८७ लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात केवळ मुंबईतीलच नव्हे, तर नाशिकमधील एका विद्यार्थ्याचीही फसवणूक झाल्याचे तपासातून समोर आले आहे. दरम्यान, आरोपी स्टेला मेहता आणि राकेश मेहता हे सध्या फरार असून त्यांनी ओडिशाकडे पलायन केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे.
या फसवणुकीमुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली असून, परदेशी शिक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. एजन्सीची अधिकृत नोंदणी, व्यवहारांची पारदर्शकता आणि कागदपत्रांची खातरजमा केल्यानंतरच व्यवहार करावेत, असा सल्लाही पोलिसांनी दिला आहे.