पुण्यात खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई; चार देशी बनावटीची पिस्तुले व पाच जिवंत काडतुसे जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथक क्रमांक २ आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत चार देशी बनावटीची पिस्तुले आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी रोहित दुर्गेश धर्माधिकारी (२४) आणि अभिषेक राजु टेंकल (२३) या दोघांना शिवाजीनगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून लोखंडी बनावटीची सिल्व्हर रंगाची चार पिस्तुले व मॅगझीन (अंदाजे किंमत १ लाख ६० हजार रुपये) तसेच KF 7.65 प्रकारची पाच जिवंत काडतुसे (किंमत ४ हजार रुपये) असा एकूण १ लाख ६४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी हे शस्त्रे कुठून आणि कोणासाठी आणत होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त निखील पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक गौरव देव यांच्यासह सुरेंद्र जगदाळे, रविंद्र रोकडे, दिलीप गोरे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, अजिनाथ येडे, पवन भोसले, साहिल शेख, अमोल राऊत, प्रशांत शिंदे, आझाद पाटील, गणेश खरात, शेखर खराडे, चेतन आपटे आणि किरण पडयाळ यांचा समावेश होता. आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.