यूट्यूब वार्ताहरावर खंडणीचा गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक : यूट्यूब व सोशल मीडियावर बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी आवामी विकास पार्टीचा पदाधिकारी आणि यूट्यूब वार्ताहर सर्फराज पठाण तसेच त्याचा सहकारी अल्ताफ शेख यांच्याविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सना शकील तांबोळी (वय २८, रा. काझीपुरा, जुने नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या पती शकील अमीर तांबोळी हे नाशिक शहरात स्टेशनरी व्यवसाय करतात. फिर्यादीनुसार, सर्फराज पठाण याने यूट्यूब व सोशल मीडियाच्या माध्यमातून तांबोळी यांच्याविरोधात खोटे व बदनामीकारक व्हिडिओ तयार करून प्रसारित केले. या व्हिडिओंमुळे फिर्यादी व त्यांच्या पतीला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच २२ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास सर्फराज पठाण आणि अल्ताफ शेख हे फिर्यादीच्या दुकानात आले. “पैसे दिले नाहीत, तर आणखी बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित करू,” अशी धमकी देत त्यांनी तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
या तक्रारीच्या आधारे भद्रकाली पोलिसांनी सर्फराज पठाण व अल्ताफ शेख यांच्याविरोधात खंडणीसह संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. सर्फराज पठाण याच्यावर यापूर्वीही विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सुरू आहे.