एअरटेलच्या मोबाईल टॉवरवरील डीएलए–एसएफ प्लेट चोरीप्रकरणी आरोपी अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील एअरटेल कंपनीच्या मोबाईल टॉवरवरील सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीच्या डीएलए–एसएफ प्लेट (कार्ड) चोरीप्रकरणी उत्तर प्रदेशातील एका आरोपीला तामलवाडी पोलिसांनी अटक केली आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे बेंबळी पोलीस ठाणे हद्दीतून त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने मराठवाड्यातील पाच ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
तामलवाडी येथील एअरटेल मोबाईल टॉवरवर नेटवर्कसाठी बसविण्यात आलेली डीएलए–एसएफ प्लेट ७ जानेवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.
तपासात ध्रुव त्रिभुवन प्रसाद (वय २५, रा. भागदिवा, ता. बारा, जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश) आणि त्याचा साथीदार हे खोटे आधार कार्ड व वाहनचालक परवाने वापरून मोठ्या शहरांतून भाड्याने चारचाकी वाहने घेत असल्याचे उघड झाले. दिवसभर मोबाईल टॉवरची टेहळणी करून रात्री महागड्या डीएलए कार्ड प्लेटची चोरी करण्याची त्यांची पद्धत होती.
तांत्रिक तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन तसेच चोरीसाठी वापरलेले साहित्य पोलिसांनी जप्त केले. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पुन्हा महाराष्ट्रात येऊन आणखी गुन्हे करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तामलवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने वैराग–गौडगाव मार्गे सापळा रचला. बेबळी पोलीस ठाणे हद्दीतील देवळाली गावच्या शिवारात आरोपी आल्यावर त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक ऋतु खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शफाकत अमना, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप टेकाळे, हवालदार संजय कलमदाने, सुरज नरवडे, नितीन भोसले आणि पोलीस मित्र अमोल पाटील यांनी केली.