अटकेची भीती दाखवून ४.६२ कोटींची फसवणूक; बँक खाती पुरवणारे दोघे अटकेत

Spread the love

अटकेची भीती दाखवून ४.६२ कोटींची फसवणूक; बँक खाती पुरवणारे दोघे अटकेत

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : अटकेची भीती दाखवून एका ७४ वर्षीय निवृत्त महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची ४ कोटी ६२ लाख रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फसवणुकीसाठी बँक खाती उपलब्ध करून दिल्याच्या आरोपाखाली नरेंद्र एस. सिन्हा आणि गुंजन देवकुमार दिनेशचंद्र या दोघांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

फसवणूक झालेल्या महिलेने आयआयटीमधून मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली असून त्या पतीसोबत पवई परिसरात वास्तव्यास आहेत. ऑक्टोबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत अज्ञात सायबर ठगांनी ट्राय आणि दिल्ली पोलिसांचे अधिकारी असल्याची बतावणी करत तिच्याशी संपर्क साधला. शारीरिक शोषण आणि मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल असल्याचे सांगत चौकशी आणि अटकेची धमकी देण्यात आली.

तपासात सहकार्य करण्याच्या नावाखाली ठगांनी तिच्या कुटुंबीयांचा व बँक खात्यांचा तपशील मिळवला. त्यानंतर एफडी, आरडी तोडून तसेच खात्यातील रक्कम त्यांनी दिलेल्या विविध खात्यांत वर्ग करण्यास तिला भाग पाडले. अटकेच्या भीतीपोटी महिलेने संबंधित कालावधीत ४.६२ कोटी रुपये ट्रान्स्फर केले. चौकशीअंती रक्कम परत मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते; मात्र पैसे परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

तक्रार दाखल होताच सायबर पोलिसांनी तोतयागिरी व आयटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तपास पश्चिम सायबर सेल विभागाकडे सोपवला. तांत्रिक तपासातून सिन्हा आणि गुंजन यांची ओळख पटली. चौकशीत त्यांनी सायबर ठगांसाठी विविध बँकांत खाती उघडून दिल्याचे, त्या खात्यांत आलेली रक्कम काढून ठगांना सुपूर्द केल्याचे आणि बदल्यात कमिशन घेतल्याचे निष्पन्न झाले. दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.

दरम्यान, २०२० पासूनच्या पाच वर्षांत सायबर फसवणुकीची सुमारे २० हजार प्रकरणे नोंदली गेली असून अंदाजे दोन हजार कोटी रुपयांची आर्थिक लूट झाली आहे. अलीकडे ‘डिजिटल अटक’ या पद्धतीने निवृत्त महिला अधिकाऱ्यांना लक्ष्य केले जात असल्याचेही तपासातून समोर आले आहे. उकल होण्याचे प्रमाण अल्प असताना, बहुतेक प्रकरणांत केवळ बँक खाती पुरवणारे दलालच पोलिसांच्या हाती लागत असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon