गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस; एकाच कुटुंबातील तिघांनी तब्बल ५५ जणांचा केला घात

Spread the love

गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस; एकाच कुटुंबातील तिघांनी तब्बल ५५ जणांचा केला घात

योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे – मुंब्रा परिसरात गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. अल्पावधीत दुप्पट-तिप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल ५५ गुंतवणूकदारांची सुमारे पाच कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कौसा परिसरातील तारीक खान याने अल्ट्रा व्हायरस कॉइन या एका कंपनीत पैसे गुंतविल्यास मोठा आर्थिक फायदा होईल असे सांगून अनेकांना जाळ्यात ओढले. या आमिषाला बळी पडलेल्या शमा युसूफ शेख यांनी ३१ जानेवारी ते २८ एप्रिल २०२५ या कालावधीत पाच लाख रुपये गुंतवले. त्यानंतर त्यांच्या पती, सासू यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांनी मिळून सुमारे २१ लाख रुपयांची गुंतवणूक केली.

या कंपनीत ५० ते ६० जणांनी पैसे गुंतवले असून एकूण गुंतवणूक अंदाजे पाच कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे यात तीन दिव्यांग व्यक्तींचाही समावेश आहे. सुरुवातीच्या एक-दोन महिन्यांत काही गुंतवणूकदारांना परतावा देण्यात आला. मात्र त्यानंतर मुद्दल आणि व्याज देण्यास टाळाटाळ सुरू झाली.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी २५ जानेवारी रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तारीक खान, त्याची पत्नी, मुलगा सैफ तसेच कंपनीतील इतर संबंधितांविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली. चार महिन्यांपासून गुंतवणूकदार न्यायासाठी प्रयत्न करत असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचीही भेट घेतली होती.

या प्रकरणात वकील सय्यद वाजिद हुसेन यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. त्यानंतर आयुक्तांनी तात्काळ तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon