माळेगाव एमआयडीसीत पेपर रोल कंपनीला आग लागून लाखोंचा कच्चामाल खाक; सुदैवाने जीवितहानी नाही
योगेश पांडे / वार्ताहर
सिन्नर – सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथील शासकीय औद्योगिक वसाहतीत असलेल्या धनश्री पेपर रोल,प्लॉट नं. जी-५ या कोरिगेटेड बॉक्ससाठी पेपर रोल तयार करणाऱ्या कंपनीत मंगळवारी मध्यरात्री १२. ३० ते ०१.०० सुमारास भीषण आग लागली. या आगीत कंपनीच्या आवारात साठवलेला रद्दी पेपर व इतर कागद स्वरूपातील कच्चामाल खाक झाला.
कंपनीच्या आवारात उघड्यावर ठेवलेल्या कच्च्या मालाला आग लागल्याने काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले. कागदाच्या साहित्यामुळे आगीच्या ज्वाळा व धुराचे लोळ तब्बल दोन किलोमीटर अंतरावरून दिसत होते. धनश्री पेपर रोल कंपनी ही हिंदुस्तान पेट्रोलियमच्या एलपीजी गॅस बॉटलिंग प्लांटच्या शेजारी असल्याने औद्योगिक वसाहतीत मोठ्या अपघाताची भीती निर्माण झाली होती. माळेगाव अग्निशमन दलासह ‘एमआयडीसी’, सिन्नर नगरपरिषद, नाशिक महापालिका व हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले.
विविध अग्निशमन दलांच्या बंबांनी सात फेऱ्या करीत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सकाळी सातच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले, तरी दुपारी एक वाजेपर्यंत हवेमुळे ठिकठिकाणी आग पुन्हा पेटत होती. त्यामुळे एमआयडीसी व नगरपरिषदेचे अग्निशमन बंब उशिरापर्यंत घटनास्थळी तैनात ठेवण्यात आले होते. या आगीत जीवितहानी झाली नसल्याची माहिती कंपनीचे मालक भावेश पटेल व व्यवस्थापक राजेंद्र पवार यांनी दिली.