हुतात्मा चौकात पार्किंगच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक; बेकायदा वसुलीचा पर्दाफाश, दोघे पोलिसांच्या ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महापालिकेने ‘ए’ वॉर्डमधील हुतात्मा चौक येथे तात्पुरत्या स्वरूपात वाहन पार्किंगची सुविधा निःशुल्क उपलब्ध करून दिली आहे. मात्र, महापालिकेच्या नावाचा गैरवापर करत या वाहनतळावर काही व्यक्ती बेकायदा वाहनतळ शुल्काची वसूल करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे फसवणूक केल्याप्रकरणी महापालिकेने संबंधितांविरोधात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
मुंबई महापालिकेने १४६ वाहनतळांवर ३४ हजार ८०८ वाहने उभी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेने अनेक वाहनतळ भाडेतत्त्वावर चालवण्यास दिली आहेत. मात्र, अनेक वाहनतळांवर वाहनचालकांकडून बेकायदा शुल्क वसुली केली जात असल्याचे प्रकार उघडकीस आले होते. महापालिकेच्या रस्ते दुरुस्ती विभागातील मुकादम रामचंद्र वसईकर यांच्या गस्तीमुळे अशीच वसुली हुतात्मा चौक येथे होत असल्याचे आता उघडकीस आला आहे.
वाहनतळावरील कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र आहे का?, ते नेमून दिलेला ड्रेसकोड पाळतात का? तसेच पार्किंगच्या गाड्या या महापालिकेने नेमून दिलेल्या जागेतच लावल्या आहेत का? मोफत वाहनतळावर कोणी बेकायदा पार्किंग शुल्काची वसुली करत आहे का, याची तपासणी वसईकर करतात.
हुतात्मा चौक येथे दोन व्यक्ती वाहनचालकांकडून पार्किंगच्या नावाखाली शुल्क आकारात असल्याचे मंगळवारी वसईकर यांना आढळून आले. चौकशी केली असता त्यांच्याकडे ‘वेल टॅग’ नावाचे पार्किंग पावती सापडली. दोघांकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ते तेथे प्रतितास वाहन पार्किंग शुल्कापोटी १५० रुपये आकारत होते. त्यामुळे हे वाहनतळ निःशुल्क असताना बेकायदा शुल्क वसुली होत असल्याचे स्पष्ट झाले. पालिकेचे मुकादम वसईकर यांनी अमित सोनी (१८) आणि क्रिश गुप्ता (१८) यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली.