मुंबईतील महिलेचा उत्तर प्रदेशात निर्घृण अंत; पती-सवतीच्या संगनमताने हत्या
पोलीस महानगर नेटवर्क
गोरखपूर : उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात मुंबईत राहणाऱ्या एका महिलेची तिच्याच पतीने दुसऱ्या पत्नीच्या मदतीने निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी पती विजय कुमार साहनी, त्याची दुसरी पत्नी संध्या तसेच या कटात सहभागी असलेल्या सासऱ्या रामबिलास यांना अटक केली आहे.
गोरखपूरमधील पीपीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० जानेवारी रोजी बरघट्टा पुलाखाली एका अज्ञात महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटू नये, यासाठी चेहऱ्यावर विटांनी वार करून तो विद्रूप करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका स्कूटीवरून एक पुरुष व दोन महिला जात असल्याचे दृश्य आढळून आले. या धाग्यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता विजय साहनीपर्यंत पोहोचण्यात यश आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव प्रिया शेट्टी (वय ३५) असून ती मुंबईची रहिवासी होती. विजय साहनी हा एका विमा कंपनीत कार्यरत होता. २०१२ साली मुंबईत दोघांची ओळख होऊन प्रेमसंबंध जुळले आणि मंदिरात विवाह झाला. त्यानंतर ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. त्यांना १३ वर्षांचा मुलगाही आहे. मात्र, विजयने २०१४ मध्ये आपल्या गावी जाऊन संध्या नावाच्या महिलेशी दुसरा विवाह केला.
काही काळानंतर प्रियाला विजयच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळाली. तिने त्याच्या घरी राहण्याचा आग्रह धरला आणि अन्यथा गावी येऊन वाद घालण्याची धमकी दिली. या तगाद्याला कंटाळून विजयने पत्नी संध्या व सासऱ्या रामबिलास यांच्याशी सल्लामसलत करून प्रियाचा काटा काढण्याचा कट रचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
यानुसार २६ जानेवारी रोजी विजय प्रियाला घेऊन मुंबईहून गोरखपूरला आला. दोन दिवस हॉटेलमध्ये मुक्काम करून २९ जानेवारीच्या रात्री तिघे पीपीगंज परिसरात पोहोचले. पुढे सहजनवाच्या दिशेने जात असताना वाद उफाळला. त्याचवेळी दारूच्या नशेत असलेल्या विजयने प्रियाचा गळा आवळून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
हत्येनंतर ओळख लपवण्यासाठी मृतदेहाचा चेहरा विटांनी ठेचून कपडे काढून तो पुलाखाली फेकून देण्यात आला. आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी कपडे नदीत टाकले, तसेच विजयने आपले रूप बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिक्षाचालकाने दिलेली माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींना अटक केली.
या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, हत्येमागील सर्व बाजूंचा सखोल तपास केला जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.