‘तुम घाटी लोग कभी सुधरोगे नहीं’ म्हणत मराठी तरुणाला मारहाण; बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजाविरोधात गुन्हा

Spread the love

‘तुम घाटी लोग कभी सुधरोगे नहीं’ म्हणत मराठी तरुणाला मारहाण; बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजाविरोधात गुन्हा

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : मुंबईत मराठी–अमराठी वाद पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा याने कार्यालयात काम करणाऱ्या एका मराठी तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात रहेजाविरोधात मारहाण तसेच अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा चेंबूर येथील डॉ. सी. जी. गिडवाणी रोडवरील ‘रहेजा होम्स’ कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होता. घटनेच्या दिवशी कार्यालयात बैठक सुरू असताना त्याला काही कागदपत्रे जोडून स्टॅपल लावण्याचे काम देण्यात आले होते. या कामात झालेल्या क्षुल्लक चुकीवरून सुशील रहेजाने तक्रारदारावर राग काढत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, रहेजाने ‘तुम घाटी लोग कभी सुधरोगे नहीं’ असे म्हणत जातीवाचक अपमान केला आणि मारहाणही केली. तसेच, तक्रारदार विशिष्ट समाजातील असल्याने त्याला पुन्हा नोकरीवर राहता येऊ नये, असे वर्तन कार्यालयात केल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.

या प्रकारानंतर तक्रारदाराने थेट गोवंडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशीअंती सुशील रहेजाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११५ तसेच अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा मराठी–अमराठी वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त होत असून, पोलिसांकडून पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon