नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ ह्या विशेष मोहिमेअंतर्गत दहशत पसरवणाऱ्या पाटणकर टोळीवर पोलिसांची कारवाई
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. पंचवटी परिसरात दहशत माजवणारा कुख्यात गुंड हर्षद पाटणकर आणि त्याचा साथीदार श्रवण पगारे या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या कारवाईचा धाक पुन्हा निर्माण झाल्याचे चित्र आहे.
नाशिक जिल्ह्यात वाढत्या खून, मारहाण, चोरी आणि दहशत निर्माण करणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ ही विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवून कठोर कारवाई केली जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून पंचवटी परिसरात रात्रीच्या वेळी हातात धारदार शस्त्र घेऊन नागरिकांना धमकावत दहशत पसरवणाऱ्या पाटणकर टोळीवर पोलिसांनी कारवाई केली.
गेल्या दहा महिन्यांपासून नाशिक पोलिसांना अक्षरशः नाकीनऊ आणणारा हर्षद पाटणकर हा शहरात दहशत माजवत होता. विविध पोलीस ठाण्यांत त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गोळीबारासह नऊहून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या रविवारी पंचवटीतील हनुमानवाडी परिसरात त्याने आपल्या जुन्या साथीदारावर प्राणघातक हल्ला करून पुन्हा एकदा दहशत निर्माण केली होती. त्यामुळे “नाशिकमध्ये पोलिसांचा धाक उरला आहे का?” असा सवाल उपस्थित होत होता.
या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखेला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पाटणकरचा माग काढला. तो साथीदार श्रवण पगारेसह शहरात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि योग्य वेळी कारवाई केली.पोलिसांनी घेराव घातल्याचे लक्षात येताच हर्षद पाटणकरने पुन्हा एकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याने धावत्या वाहनातून उडी घेतली. मात्र, या प्रयत्नात तो जखमी झाला आणि अखेर पोलिसांनी त्याला पकडण्यात यश मिळवले. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.