सेलूत ८.४३ किलो गांजा जप्त; एकावर गुन्हा; जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधातील कारवाईमुळे तस्करांत खळबळ
परभणी : जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. सेलू शहरातील राजीव गांधी नगर परिसरात टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तब्बल ८ किलो ४३२ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशानुसार बुधवारी (दि. २८) स्थानिक गुन्हे शाखा व सेलू पोलीस ठाण्याचे पथक अवैध धंदे, अमली पदार्थांची विक्री व तस्करी रोखण्यासाठी गस्त घालत होते. याचदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सेलू येथील राजीव गांधी नगर परिसरात राहणाऱ्या शेख कौसर शेख अमीर (वय ६०) यांच्या घरावर छापा टाकण्यात आला.
घराची झडती घेतली असता तेथून एकूण ८ किलो ४३२ ग्रॅम गांजा आढळून आला. जप्त केलेल्या गांजाची अंदाजे बाजार किंमत सुमारे १ लाख ६८ हजार ६३० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. कारवाईदरम्यान गटविकास अधिकारी उदय भोसले तसेच पोलीस निरीक्षक दीपक बोरसे उपस्थित होते.
या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार यांच्या फिर्यादीवरून सेलू पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी गांजा कुठून आणत होता आणि त्याची विक्री कोणाला केली जात होती, याबाबत सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशान्वये तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलिस उपनिरीक्षक गणेश पवार, अंमलदार विलास सातपुते, मधुकर ढवळे, उमेश चव्हाण, चाटे, दुबे, पोळ, हनवते तसेच महिला पोलिस कर्मचारी सारंग यांनी सहभाग घेतला.
जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, पुढील काळातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.