तीन महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण उघडकीस; १६०० सीसीटीव्ही तपासून मुंब्रा पोलिसांची सहा दिवसांत कामगिरी

Spread the love

तीन महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण उघडकीस; १६०० सीसीटीव्ही तपासून मुंब्रा पोलिसांची सहा दिवसांत कामगिरी

पोलीस महानगर नेटवर्क

मुंब्रा : तीन महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मुंब्रा पोलिसांनी अवघ्या सहा दिवसांत अपहरण झालेल्या बाळाला सुखरूप शोधून काढत आरोपींना ताब्यात घेतले. तब्बल १६०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या मदतीने ही गुन्हेगारी उघडकीस आणण्यात आली.

दि. २२ जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास डीसीबी बँकेसमोरील खाडीमशीन रस्त्यावर फरजाना मोहम्मद फिरोज मन्सुरी (वय २३, रा. कौसा, मुंब्रा) या आपल्या दोन मुलींना घेऊन रस्ता ओलांडत असताना ही घटना घडली. त्यावेळी एका अनोळखी बुरखाधारी महिलेने “मीही समोरच जात आहे” असे सांगत तीन महिन्यांची आफिया हिला कुशीत घेतले व क्षणात पसार झाली. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेची गंभीरता लक्षात घेता चार तपास पथके तात्काळ नियुक्त करण्यात आली. घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही तपासात अपहरण करणारी महिला रिक्षातून मुंब्रा रेल्वे स्थानकापर्यंत गेल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपासात तिच्यासोबत एक पुरुष व आणखी एक महिला असल्याचे निष्पन्न झाले. संशयितांनी तपासाची दिशाभूल करण्यासाठी बाळाचे कपडे व महिलांनी नकाब बदलल्याचेही आढळून आले.

मुंब्रा ते सीएसएमटी तसेच टिटवाळा-वांगणी मार्गावरील विविध स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी ठाणे स्थानकावर उतरल्याचे समोर आले. मात्र तेथून पुढे तपास कठीण झाल्यानंतर, तिसऱ्या संशयित महिलेच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. ती महिला इन्शानगर, मुंब्रा येथील एका परिसरात गेल्याचे समजताच गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी नसरीन इकलाख शेख हिला ताब्यात घेतले.

तिच्या चौकशीत अपहरण झालेले बाळ अकोला जिल्ह्यातील खेटरी (ता. पातूर) येथे असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तेथून बाळ आफिया हिला सुखरूप ताब्यात घेतले. यावेळी मोहम्मद मुजीब गुलाब (वय ३१) व त्याची पत्नी खैरूणिसा मुजीब मोहम्मद (वय ३०) यांनाही अटक करण्यात आली. सहा दिवस दररोज १६ ते १८ तास अहोरात्र तपास करत मुंब्रा पोलिसांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अशुतोष डुंबरे, सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर आयुक्त विनायक देशमुख, उपायुक्त सुभाषचंद्र बुरसे व सहाय्यक आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक शरद कुंभार, सपोनि तेजस सावंत यांच्यासह तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाखरे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon