सुनेत्रा पवार यांची उद्या उपमुख्यमंत्रीपदी निवड होणार; लगेचच शपथविधी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – अजित पवार यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सुनेत्रा पवार यांची शनिवारी निवड केली जाणार आहे. त्यानंतर लगेचच त्यांचा शपथविधी पार पडेल, असे समजते.
राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवड करण्यासाठी आज, आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाईल. त्यानंतर पवार यांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांचा राज्य मंत्रिमंडळात लगेचच समावेश करण्यात येणार आहे. हा शपथविधीचा समारंभ अत्यंत साधेपणाने पार पाडला जाईल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. तेव्हा पक्षाच्या वतीने सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. शनिवारी दुपारी विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडेल. त्यात सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड केली जाईल. राष्ट्रवादीच्या वतीने लगेचच मुख्यमंत्र्यांकडे निवडीचे पत्र दिले जाणार आहे. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी लगेचच पार पडेल, असे समजते. अर्थात, राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या नियोजित कार्यक्रमावर ते अवलंबून असेल.अजित पवारांकडील वित्त व नियोजन, उत्पादन शुल्क ही खाती पक्षाकडेच कायम राहावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त करण्यात आल्याचे समजते.