दारूच्या नशेत खटके उडाले! बायको झोपेत असतानाच उपसरपंच पतीने काढला काटा; आरोपी पतीचा स्वतःही कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील साकोरेपाडा गावात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. गावाचे उपसरपंच जयराम पवार याने दारूच्या नशेत आपल्या पत्नी जिजाबाई पवार यांची झोपेत असताना धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर आरोपी पतीने स्वतःही कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयराम पवार आणि त्यांची पत्नी जिजाबाई पवार यांच्यात दारूच्या नशेतून घरगुती कारणावरून जोरदार वाद झाला होता. वादानंतर जिजाबाई पवार झोपेत असताना आरोपी पतीने धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करत त्यांची हत्या केली. हल्ला इतका गंभीर होता की जिजाबाई पवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी जयराम पवार याने स्वतःवरही कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच कळवण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गावाचे उपसरपंचच या प्रकरणात आरोपी निघाल्याने साकोरेपाडा गावासह संपूर्ण कळवण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास कळवण पोलीस करत आहेत.