पोलिस अधीक्षक कार्यालयातच महिला कर्मचाऱ्याचा छळ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
अहिल्यानगर – कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिस अधीक्षक कार्यालयातच महिला पोलीस कर्मचाऱ्याशी गैरवर्तन, मानसिक छळ आणि धमक्यांचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने पदाचा गैरवापर करत थेट संबंधाचा प्रस्ताव दिल्याचा, तर एका खासगी व्यक्तीने कार्यालय परिसरातच अश्लील आणि धमकीवजा वर्तन केल्याचा गंभीर आरोप असून या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला कर्मचाऱ्याने मंगळवारी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीनुसार दीपक सरोदे (पोलीस कर्मचारी) आणि भाऊसाहेब शिंदे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारीनुसार, शिंदे हा अधीक्षक कार्यालयात आला असताना त्याला अपर पोलिस अधीक्षकांकडे पाठविण्यात आले. याच कारणावरून संतप्त होत त्याने फिर्यादीकडे धाव घेण्याचा प्रयत्न करत तुला मी दाखवतो अशी धमकी दिली. त्यानंतर सतत मेल आणि अर्ज पाठवून मानसिक त्रास देणे, कार्यालयात येऊन धमकीची भाषा वापरणे असे प्रकार सुरूच ठेवले, असे तक्रारीत नमूद आहे.
२३ जानेवारी रोजी त्याने फिर्यादीला कार्यालयात बोलावून सगळं माझ्या हातात आहे, म्हणत तिच्याविरोधातील अर्ज थांबवण्याचे किंवा वाढवण्याचे आमिष दाखवत थेट संबंधाचा प्रस्ताव दिल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे, दि. ७ जानेवारी रोजी विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात उपस्थित असतानाच कार्यालयाच्या आवारात शिंदे याने फिर्यादीकडे पाहून अश्लील शब्दप्रयोग करत तिची लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
पोलिस कार्यालयातच महिला कर्मचाऱ्याशी घडलेला हा प्रकार गंभीर आणि लज्जास्पद मानला जात आहे. दरम्यान, दीपक सरोदे याची बदली शहर वाहतूक शाखेत करण्यात आली असून त्याच्याकडील स्टेनोचे काम काढून घेण्यात आले आहे. पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. पोलिस कार्यालयातच महिला कर्मचाऱ्याशी घडलेला हा प्रकार गंभीर व लज्जास्पद मानला जात असून पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.