ठाकरे बंधूंविरोधात अपशब्द वापरणे अंगलट; कार्यकर्त्यांनी तरुणाला घरात घुसून चोपलं

Spread the love

ठाकरे बंधूंविरोधात अपशब्द वापरणे अंगलट; कार्यकर्त्यांनी तरुणाला घरात घुसून चोपलं

योगेश पांडे / वार्ताहर

नालासोपारा – सोशल मीडियाचा स्वैर वापर आणि राजकीय नेत्यांबद्दलची अभद्र भाषा सध्या एका तरुणाला चांगलीच नडली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांसारख्या महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विखारी टीका करणाऱ्या सूरज राजे शिर्के नावाच्या तरुणाला मनसे आणि शिवसेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी चोप दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा येथील आचोळे परिसरात राहणारा सूरज शिर्के गेल्या काही दिवसांपासून फेसबुक आणि इतर सोशल मीडिया व्यासपीठांवरून ठाकरे बंधूंबद्दल एकेरी भाषेत आणि अपमानास्पद रिल्स तयार करत होता. या रिल्समुळे मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते कमालीचे संतप्त झाले होते.

गुरुवारी रात्री कार्यकर्त्यांना सूरजचा पत्ता मिळताच त्यांनी थेट आचोळे येथील त्याच्या घरात प्रवेश केला. कार्यकर्त्यांनी त्याला घरातून ओढत बाहेर काढले आणि बेदम मारहाण केली. संतापाचा पारा इतका चढला होता की, कार्यकर्त्यांनी सूरजची अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावरून धिंड काढली. मारहाण केल्यानंतर त्याला तुळींज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

या घटनेवर बोलताना मनसे कार्यकर्ता किरण नकाशे आणि उद्धव गटाचे कार्यकर्ता रोहन चव्हाण यांनी आक्रमक पवित्रा घेतला. “अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आमच्या दैवतांबद्दल अपशब्द वापरले, तर ते खपवून घेतले जाणार नाही. हा केवळ सूरज शिर्केला दिलेला धडा नसून अशा प्रकारे वागणाऱ्या इतरांनाही इशारा आहे,” असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, सूरजची बहीण साधना शिर्के यांनी या मारहाणीचा निषेध केला असून, कायद्यानुसार कारवाई व्हायला हवी होती, असे मत व्यक्त केले आहे. दरम्यान, सूरजने आपले कृत्य मान्य करत माफी मागितली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon