ठाण्यात शिंदे-फडणवीसांचा मोठा निर्णय!
शिंदे गटाच्या शर्मिला पिंपोळकर महापौर तर भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौर पदी निवड
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाणे महानगरपालिकेतील सत्तास्थापनेबाबतची राजकीय गणिते अंतिम टप्प्यात आली असून, महापौर पदावर शिवसेना शिंदे गटाचा दावा निश्चित झाल्याचे चित्र आहे. शिवसेनेकडून शर्मिला पिंपोळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
शुक्रवारी महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असल्याने, ठाण्याच्या राजकारणात सकाळपासूनच मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. ठाणे महापालिकेच्या महापौर केबिनमध्ये शिवसेनेच्या सर्व महिला नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी विमल भोईर, शर्मिला पिंपोळकर आणि डॉ. दर्शन जानकर हे महापौर पदाचे प्रबळ दावेदार उपस्थित होते. या बैठकीत शिवसेनेचा महापौर पदाचा चेहरा निश्चित करण्यात आला आहे. शर्मिला पिंपोळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत आहे.
दुसरीकडे, ठाण्यात भाजपची आक्रमक विरोधाची भूमिका आता मावळल्याचे दिसून येत आहे. भाजपने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, उपमहापौर पदावरही भाजपचा प्रतिनिधी बसवण्याची तयारी केली आहे. भाजपकडून कृष्णा पाटील यांना उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, शिंदेसेनेने ठाण्यात भाजपला दोन वर्षांसाठी महापौरपद देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ठाणे महापालिका निवडणूक युतीत शिंदेसेनेला ७५, तर भाजपला २८ जागा मिळाल्या आहेत. संख्याबळाच्या जोरावर शिवसेनेने भाजपला एक वर्षही महापौरपद देणार नसल्याचे स्थानिक पातळीवर स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापौरपद मिळणार नसल्याने भाजपने स्थायी समिती, परिवहन समिती, विषय समित्या, प्रभाग समित्या आणि शिक्षण मंडळावर दावा ठोकला आहे. शिंदेसेनेकडून भाजपला उपमहापौरपद घ्यावे, तसेच विषय आणि प्रभाग समित्या तीन व दोन वर्षे अशा कालावधीत दोन्ही पक्षांकडे राहतील, असा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एकूणच, ठाण्यात महापौरपद शिवसेनेकडे जाणार हे जवळपास निश्चित झाल्याचे पाहायला मिळत आहे.