कल्याण-डोंबिवली महापौर–उपमहापौर पदांचे चित्र स्पष्ट
महापौरपदी ॲड. हर्षाली थविल-चौधरी, उपमहापौरपदी राहुल दामले यांचा एकमेव अर्ज
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण-डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारी पूर्ण झाली असून, दोन्ही पदांवरील निवड जवळपास निश्चित झाली आहे. महापौर पदासाठी शिवसेनेच्या ॲड. हर्षाली थविल-चौधरी तर उपमहापौर पदासाठी भाजपचे राहुल दामले यांनी अर्ज दाखल केला आहे. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने आगामी निवडणूक औपचारिक ठरण्याची शक्यता आहे.
शिवसेना–भाजप तसेच मनसेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, मनसेचे नेते राजू पाटील, भाजपचे नाना सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस होता. मात्र कोणताही प्रतिस्पर्धी अर्ज न आल्याने ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेतील निवडणूक प्रक्रिया औपचारिक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, नव्या महापौर व उपमहापौरांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. शहरातील पायाभूत सुविधा, नागरी सेवा आणि विकासकामांना प्राधान्य देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.