जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुकीचे मतदान आणि निकाल पुढे ढकलला; तारखेत मोठा बदल

Spread the love

जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुकीचे मतदान आणि निकाल पुढे ढकलला; तारखेत मोठा बदल

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखेमध्ये राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ५ फेब्रुवार रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी रोजी होणार असून आहे. तर मतमोजणीची तारीखही बदलून ९ फेब्रुवारी करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी १३ जानेवारी २०२६ रोजी सविस्तर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, निवडणूक चिन्ह वाटप तसेच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे अद्याप शिल्लक होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी अपघाती निधन झाल्यानंतर राज्य शासनाने 28 ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला. या कालावधीत कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचे निर्देश असल्याने निवडणूक प्रक्रियेतील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्याची गरज निर्माण झाली.या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ नंतर फक्त दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने मतदान आणि मतमोजणीच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित जिल्हाधिकारी ३१ जानेवारी रोजी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत सूचना प्रसिद्ध करणार आहेत. त्यानुसार आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे.नवीन कार्यक्रमानुसार जाहीर प्रचाराची समाप्ती ५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता होईल. तर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता तात्काळ संपुष्टात येईल.

मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची नावे ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon