सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ७८ लाखांचा गंडा; सायबर पोलिसांच्या कारवाईत ३४ लाखांची रक्कम परत

Spread the love

सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ७८ लाखांचा गंडा; सायबर पोलिसांच्या कारवाईत ३४ लाखांची रक्कम परत

पोलीस महानगर नेटवर्क

नागपूर : सायबर गुन्हेगारांनी मनी लॉंड्रिंग प्रकरणात अडकवण्याची धमकी देत भारतीय विमानतळ प्राधिकरणातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्याची तब्बल ७८.५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र सायबर पोलिसांनी वेळीच तपास करत गुन्ह्यात वापरलेली बँक खाती गोठवून ३४ लाख रुपये पीडित अधिकाऱ्याला परत मिळवून दिले.

११ नोव्हेंबर रोजी स्वतःला पोलीस उपनिरीक्षक विजय खन्ना असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीने संबंधित अधिकाऱ्याला फोन केला. जेट एअरवेजचे अध्यक्ष नरेश गोयल यांच्या ५३८ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात आपल्या खात्यातून दोन कोटी रुपये ट्रान्सफर झाल्याचा दावा करत आरोपीने कठोर कारवाईची धमकी दिली. त्यानंतर व्हिडीओ कॉल सुरू ठेवण्यास भाग पाडत भीतीचे वातावरण निर्माण करून आरोपींनी अधिकाऱ्याकडून टप्प्याटप्प्याने ७८.५० लाख रुपये उकळले.

काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्याने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून मनी ट्रेलच्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान सायबर पोलिसांचे पथक राजस्थानमधील जयपूर येथे पोहोचले. तेथे ओमप्रकाश भवरलाल जाखड (४९, रा. जयपूर) याला अटक करण्यात आली. ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला नागपूरला आणण्यात आले.

फसवणुकीसाठी वापरण्यात आलेली विविध बँक खाती पोलिसांनी गोठवली असून त्यातून ३४ लाख रुपये पीडित अधिकाऱ्याला परत मिळवून देण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली कविकांत चौधरी, शैलेश निघुट, अजय पवार आणि रोहित मटाले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon