चेंबूरमध्ये शिधावाटप धान्याचा काळाबाजार; तिघांविरोधात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : शिधावाटप दुकानातील गहू आणि तांदूळ शिधापत्रिकाधारकांना वितरित न करता काळाबाजारात विक्री केल्याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत दोन टेम्पो आणि शिधावाटप दुकानातील मोठ्या प्रमाणावरील धान्य जप्त करण्यात आले आहे.
२४ जानेवारी रोजी चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी परिसरात दोन टेम्पोमधून शिधावाटप दुकानातील मोठ्या प्रमाणावर धान्य नेले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार चेंबूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही टेम्पो ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान टेम्पोमधून शिधावाटप दुकानातील गव्हाच्या २२ गोण्या आढळून आल्या.
या प्रकरणाची माहिती पोलिसांनी चेंबूर शिधावाटप अधिकाऱ्यांना दिली. शिधावाटप अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात येऊन टेम्पोतील धान्याची तपासणी केली असता ते धान्य शिधावाटप दुकानातूनच असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी टेम्पो चालकांकडे चौकशी केली असता, सिद्धार्थ कॉलनीतील दुकान क्रमांक ३३ ई ९८ येथून हे धान्य नेले जात असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर शिधावाटप अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधित दुकानाची मालक हिराबाई गांगुर्डे तसेच दोन्ही टेम्पो चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चेंबूर पोलीस करत आहेत.