पार्थ, जय पवारांकडून मुखाग्नी; अजित पवारांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पोलीस महानगर नेटवर्क
बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचे आणि शिस्तप्रिय नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या पार्थिवाला सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. या वेळी विद्या प्रतिष्ठान परिसरात शोकाकुल वातावरण पसरले होते.
अंत्यसंस्कारापूर्वी महाराष्ट्र पोलिसांच्या पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. बिगुलच्या करुण सुरांत वातावरण भारावून गेले होते. मुखाग्नी दिल्यानंतर उपस्थित हजारो कार्यकर्त्यांनी ‘अजित दादा अमर रहे’ आणि ‘एकच वादा, अजित दादा’ अशा घोषणांतून आपल्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.
पित्याला अखेरचा निरोप देताना पार्थ आणि जय पवार भावूक झाले होते. दोघांनाही सावरण्यासाठी नातेवाईक आणि निकटवर्तीयांना पुढे यावे लागले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
बारामतीकरांनी पहाटेपासूनच अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दुपारपर्यंत ही गर्दी जनसागरात रूपांतरित झाली. जनतेशी थेट नाते, प्रशासनावर पकड आणि स्पष्ट निर्णयक्षमतेमुळे अजित पवार यांचे राजकारणात वेगळे स्थान होते. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकीय जीवनात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना उपस्थितांतून व्यक्त होत होती.