मैत्रीणीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाची मुलीच्या कुटुंबीयांकडून हत्या; ५ महिलांसह ६ जणांना अटक, ४ जणांचा शोध सुरु

Spread the love

मैत्रीणीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाची मुलीच्या कुटुंबीयांकडून हत्या; ५ महिलांसह ६ जणांना अटक, ४ जणांचा शोध सुरु

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे – पुण्यातील कोथरूड परिसरात मैत्रीच्या नात्यावरून संतापलेल्या कुटुंबीयांनी २३ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या नागेश जाधव याला इमारतीच्या टेरेसवर नेऊन लाकडी दांडक्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान ससून रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सहा आरोपींना अटक झाली असून चौघांचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागेश संजय जाधव (२३) हा तरुण शनिवारी सायंकाळी आपल्या मैत्रीणीला भेटण्यासाठी कोथरूडमधील मेगासिटी परिसरात गेला होता. दोघांमध्ये मैत्री असल्यामुळे ते फोनवर बोलत असत. मात्र मुलीला वारंवार का भेटतो, या कारणावरून मुलीच्या कुटुंबीयांना संताप आला. सायंकाळी सुमारे आठच्या सुमारास नागेशला इमारतीच्या टेरेसवर नेण्यात आले. तेथे काही महिला व पुरुषांनी मिळून त्याला लाकडी दांडक्यांनी तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

गंभीर जखमी अवस्थेत नागेश खाली पडलेला असताना त्याच्या कुटुंबीयांना फोन करून “तुमचा मुलगा मेगासिटी येथे आहे, दहा मिनिटांत येऊन घेऊन जा, नाहीतर खाली फेकून देऊ,” अशी धमकी देण्यात आली होती.घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागेशला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना ससून रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी नागेशची आई सुरेखा जाधव यांच्या फिर्यादीवरून दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, “या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये पाच महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे.पोस्टमार्टम अहवालानंतर अधिक माहिती स्पष्ट होईल,” असे त्यांनी सांगितले. कोथरूड पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon