घरातच रक्तपात!आईनंच ११ वर्षीय मुलाचा गळा चिरला, मुलीवरही प्राणघातक हल्ला
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यातील वाघोली परिसरात एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका आईने स्वतःच्या ११ वर्षांच्या मुलाचा गळा चिरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याच वेळेस महिलेने स्वतःच्या १३ वर्षांच्या मुलीवरही प्राणघातक हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यामध्ये मुलगी बचावली आहे, पण गंभीर जखमी झालीय. वाघोलीत अवघ्या दोन दिवसांत घडलेली ही दुसरी मन सून्न करणारी घटना आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालीय.
ही घटना वाघोली येथील बायफ रोड परिसरात घडली. सोनी संतोष जायभाय, ज्या मूळच्या नांदेडच्या कंधारचे रहिवासी आहेत. पण सध्या पुण्यातील वाघोली येथील बायफ रोड परिसरात वास्तव्यास होत्या. या महिलेने स्वतःच्याच मुलांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आलीय. ज्यामध्ये ११ वर्षीय मुलगा साईराज संतोष जायभाय याचा जागीच मृत्यू झाला तर १३ वर्षीय मुलगी धनश्री संतोष जायभाय गंभीर जखमी झालीय, तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे. तिने स्वतःच्याच मुलांवर प्राणघातक हल्ला का केला? याचा तपास सुरू आहे. कौटुंबिक वाद की मानसिक तणाव? यामागचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. वाघोलीत सतत घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.