पुण्यातील धक्कादायक घटनेनं पुन्हा महाराष्ट्र हादरला!
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; सासु, सासरे, पती आणि दिरावर गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यातील एका धक्कादायक घटनेनं पुन्हा महाराष्ट्र हादरला आहे. पुण्यातील उरुळीकांचन जवळील सोरतापवाडीमधील दीप्ती मगर चौधरीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.सासरच्या जाचाला कंटाळून दिप्तीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. पती, दीर आणि सासू-सासरे यांच्या विरोधात उरुळी कांचन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पती रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी तर दीर रोहित चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीप्तीचा २०१९ मध्ये रोहन चौधरीसोबत विवाह झाला होता. यावेळी लग्नामध्ये ५० तोळे सोने देखील देण्यात आले होते.दीप्तीच्या आईने दिलेल्या तक्रारीनूसार, लग्नानंतर दीप्तीवर वेगवेगळे आरोप करण्यात आले. त्यात तिच्या चरित्रावर संशय घेणे,दिसायला सुंदर नाही,घरातली काम येत नाहीत असे वेगवेगळे आरोप करत दीप्तीचा सासरच्यांकडून छळ करण्यात आला.
मुलीचा संसार चांगला व्हावा यासाठी तिच्या सासरच्यांना एकदा १० लाख रुपये कॅश आणि गाडी घेण्यासाठी २५ लाख रुपये दिले होते. मात्र तरीही दीप्तीला त्रास द्यायचं थांबलं नाही. अखेर दीप्तीने गळफास लावून आत्महत्या केली.पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये दीप्तीचा गर्भपात केल्याचंही समोर आलं आहे.
दीप्तीच्या पोटातील बाळ हे मुलगी असल्याचे समजल्यावर माझे पती रोहन, सासु सुनिता व सासरे कारभारी व दीर रोहित यांनी माझी इच्छा नसताना जबरदस्तीने माझा गर्भपात केला आहे, असे तिने मला सांगितले तेव्हा मला धक्का बसला. परंतु मी तिला आधार देत समजावून सांगितले व शांत केले, असं दीप्तीच्या आईने पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.आरोपी सासू सुनिता चौधरी या ऑक्टोबर २०२५ मध्ये उरुळी कांचन जवळील सोरतापवाडीच्या सरपंच झाल्या होत्या. तर सासरे शिक्षक आहेत.