बुकिंग रद्द करताच मसाज थेरपिस्टची आगपाखड; महिलेसह मुलाला मारहाण केल्याचा आरोप
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : अर्बन कंपनी अॅपद्वारे बुक केलेली मसाज सेवा रद्द केल्याच्या रागातून मसाज थेरपिस्टने महिला ग्राहकावर तसेच तिच्या मुलावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार वडाळा परिसरात उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत असून, पीडितेच्या तक्रारीवरून वडाळा पोलिसांनी संबंधित थेरपिस्टविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळा येथे राहणाऱ्या ४६ वर्षीय महिलेने फ्रोझन शोल्डरच्या उपचारासाठी अर्बन कंपनी अॅपद्वारे मसाज सेवा बुक केली होती. ठरलेल्या वेळेला एक महिला थेरपिस्ट तिच्या घरी आली. मात्र, थेरपिस्टची कार्यपद्धती तसेच सोबत आणलेला मोठा मसाज बेड पाहून पीडित महिला अस्वस्थ झाली. त्यामुळे तिने सेशन रद्द करत परतफेड प्रक्रिया सुरू केली.
याच कारणावरून थेरपिस्ट संतप्त झाला आणि पीडित महिलेशी वाद घालू लागला, असा आरोप करण्यात आला आहे. वाद वाढत गेल्यानंतर त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. या झटापटीदरम्यान थेरपिस्टने महिलेचे केस ओढले, चेहऱ्यावर ठोसा मारला, ओरबाडले आणि तिला जमिनीवर ढकलले. भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या तिच्या मुलालाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
प्रसंग हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पीडितेने पोलिसांच्या १०० क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले; मात्र तोपर्यंत आरोपी थेरपिस्ट पसार झाला होता. त्यानंतर पीडितेने वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. दरम्यान, अर्बन कंपनी अॅपमध्ये संबंधित थेरपिस्टच्या नाव व ओळखीबाबत तांत्रिक त्रुटी आढळून आल्याची बाबही तपासात समोर आली असून, ती नंतर दुरुस्त करण्यात आली आहे. हल्ल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने या घटनेची दखल अधिक गांभीर्याने घेतली जात आहे.