पुण्यात डेटिंग ॲपवरुन तरुणाची मोठी फसवणूक; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – ऑनलाइन डेटिंगच्या नादात एका तरुणाची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. सोशल मीडिया आणि डेटिंग ॲप्सवरून मैत्री करून तरुणांना जाळ्यात ओढणारी एक टोळी शहरात कार्यरत असून, त्यांनी नुकतेच एका तरुणाला कोंढवा भागात लुटल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २७ वर्षीय तरुण वाघोली परिसरात वास्तव्यास आहे. एका समलिंगी डेटिंग ॲपवर त्याची ‘Im Top’ अशा युजरनेम असलेल्या व्यक्तीशी ओळख झाली. चॅटिंग दरम्यान समोरच्या व्यक्तीने आपले नाव ‘राहिल’ असल्याचे सांगत या तरुणाचा विश्वास संपादन केला. काही दिवस बोलणे झाल्यानंतर आरोपीने तरुणाला प्रत्यक्ष भेटीसाठी आणि शारीरिक संबंधांच्या बहाण्याने कोंढव्यातील शितल पेट्रोल पंपाजवळ बोलावले.
ठरल्याप्रमाणे पीडित तरुण भेटीच्या ठिकाणी पोहोचला. तिथे ‘राहिल’ सोबत त्याचे इतर तीन साथीदार आधीच उपस्थित होते. सुरुवातीला गप्पा मारून त्यांनी तरुणाला विश्वासात घेतले आणि त्यानंतर त्याला बोलत-बोलत पानसरे नगर येथील एका मोकळ्या मैदानावर नेले. ती जागा निर्जन असल्याचे पाहून आरोपींनी आपला रंग दाखवला.
चौघांनी मिळून तरुणाला जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच, हत्याराचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या तरुणाकडील महागडा मोबाईल, अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम काढून घेतली. एवढ्यावरच न थांबता, त्याला बळजबरीने एटीएममध्ये नेऊन पैसे काढण्यास लावले. अशा प्रकारे तब्बल ८० हजार ३०० रुपयांचा ऐवज लुटून आरोपींनी तिथून पोबारा केला.
फसवणूक आणि लुटालूट झाल्याचे लक्षात आल्यावर पीडित तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास वेगाने सुरू केला. डेटिंग ॲपवरील चॅटिंगचा तपशील, वापरलेला मोबाईल नंबर आणि घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस आरोपींचा मागोवा घेतला. त्यानुसार राहिल अकिल शेख (१९), शाहीद शानूर मोमीन (२५), रोहन नईम शेख (१९) आणि इशान निसार शेख (२५) यांना कोंढवा पोलिसांनी अटक केले आहे.