मेल–एक्सप्रेसमधील चोऱ्यांना आळा! लोहमार्ग गुन्हे शाखेच्या विशेष कृती दलाची मोठी कामगिरी; ₹२१ लाखांचा सोनं–चांदीचा मुद्देमाल जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : मेल व एक्सप्रेस रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस लोहमार्ग गुन्हे शाखेच्या विशेष कृती दलाने अटक करत मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत आरोपीकडून तब्बल ₹२१ लाखांचा सोनं–चांदीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
लोहमार्ग पोलीस आयुक्तालयांतर्गत विशेष कृती दल व गुन्हे शाखेला मेल–एक्सप्रेसमध्ये होत असलेल्या चोऱ्यांबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून संशयित आरोपीवर नजर ठेवण्यात आली. तपासादरम्यान आरोपीकडून विविध ठिकाणी केलेल्या चोऱ्यांची कबुली देण्यात आली असून, त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने व चांदीचे साहित्य जप्त करण्यात आले.
या कारवाईमुळे मेल–एक्सप्रेसमधील प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत असून, लोहमार्ग पोलीसांच्या सतर्कतेचे कौतुक केले जात आहे. आरोपीविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.