मालाडमध्ये अडीच महिन्यांच्या श्वानाच्या पिल्लावर लैंगिक अत्याचार; नराधमाला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतील मालाड पूर्व भागातील कुरार गावातून माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली. एका २० वर्षीय तरुणाने अडीच महिन्यांच्या निष्पाप श्वानाच्या पिल्लावर लैंगिक अत्याचार करून त्याला निर्घृणपणे मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. या घटनेने प्राणीप्रेमींसह सर्वसामान्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
‘प्युअर ॲनिमल लव्हर्स फाउंडेशन’ या प्राणी कल्याण संस्थेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला. संस्थेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, स्थानिक प्राणी कार्यकर्ते आणि मुंबई पोलीस कुरार गावातील एका सार्वजनिक शौचालयापाशी पोहोचले. आरोपीने आतून दरवाजा बंद केला होता आणि तो उघडण्यास नकार देत होता. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून दरवाजा उघडला तेव्हा आरोपी अर्धनग्न अवस्थेत आढळला. पोलिसांनी त्याला जागीच ताब्यात घेतले आहे.
या क्रूर अत्याचारामुळे श्वानाचे पिल्लू गंभीर जखमी झाले आहे. पीएएल फाउंडेशनने दिलेल्या माहितीनुसार, पिल्लाला तातडीने वाचवून वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत. “कोणत्याही मुक्या प्राण्याला अशा अमानवी क्रूरतेचा सामना करावा लागू नये, आम्ही आरोपीला कठोर शिक्षेची मागणी करतो”, असे संस्थेने म्हटले आहे.
संबंधित २० वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि ‘प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्या’च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.