जीएसटी क्रमांक सुरू करण्यासाठी ३५ हजारांची लाच; राज्य कर निरीक्षक सापळ्यात अडकला

Spread the love

जीएसटी क्रमांक सुरू करण्यासाठी ३५ हजारांची लाच; राज्य कर निरीक्षक सापळ्यात अडकला

पोलीस महानगर नेटवर्क

भंडारा : बंद पडलेला जीएसटी क्रमांक पुन्हा सुरू करून देण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वस्तू व सेवा कर विभागातील राज्य कर निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी सापळा रचून अटक केली. ही कारवाई भंडारा येथील जीएसटी कार्यालयात करण्यात आली.

मनीष मुरलीधर सहारे (वय ५०) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदाराचा जीएसटी क्रमांक ऑक्टोबर २०२५ पासून बंद होता. तो पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांनी २ नोव्हेंबर २०२५ रोजी ऑनलाइन अर्ज सादर केला होता. त्यानंतर नागपूर येथील जीएसटी कार्यालयाकडून फर्मची लेझर शीट तयार करून त्यानुसार चालान भरण्याचे निर्देश देण्यात आले. तक्रारदाराने लेझर शीट तयार करून १०,४२८ रुपयांचे चालान भरले.

यानंतर तक्रारदाराने भंडारा येथील राज्य कर निरीक्षक सहारे यांची भेट घेऊन जीएसटी क्रमांक अद्याप सुरू न झाल्याची माहिती दिली. त्यावेळी सहारे यांनी जीएसटी क्रमांक सुरू करून देण्याच्या मोबदल्यात ३५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १५ जानेवारी रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली.
१६ जानेवारी रोजी पंचासमक्ष पडताळणीदरम्यान सहारे यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंगळवारी सापळा रचून सहारे यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आला असून, घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे.
पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon