निवडणूक संपताच तलवारधारींचा धुमाकूळ; नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दिघा विभागातील प्रभाग क्रमांक १ व २ मध्ये धक्कादायक निकाल लागला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी परिसरात दहशतीचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रभाग क्रमांक एक मधील ईश्वर नगर आणि सद्गुरु नगर परिसरात रात्रीच्या सुमारास काही तरुण हातात तलवारी घेऊन घुसले. त्यांनी शिवीगाळ करत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. तलवारधारी तरुणांनी काही नागरिकांना मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांच्या हातात तलवारी पाहून अनेक नागरिक भीतीपोटी पळापळ करू लागले होते.
याच वेळी या तरुणांनी दुकानांच्या शटरवर तलवारी मारून दहशत पसरवली. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीती पसरली आहे. या घटनेची माहिती रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलिसांनी केवळ घटनास्थळाचा पंचनामा करून औपचारिकता पार पाडली, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. आरोपींचा शोध घेऊन ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी दहशत माजविणाऱ्या तलवारधारी तरुणांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच मुकुंद कंपनी ते अनंतनगर या रस्त्यावर रात्रीच्या वेळेत गस्तीपथक तैनात करावे, तातडीने बीट चौकी उभारावी, अवैध ढाबे व चायनीज खाद्यगृह बंद करावीत आणि रात्री उशिरापर्यंत विनापरवाना सुरू असलेले पान स्टॉल बंद करावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.