लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, ४० लाखांची देशी दारू जप्त

Spread the love

लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, ४० लाखांची देशी दारू जप्त

योगेश पांडे / वार्ताहर

कोल्हापूर – जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापुरात मोठी कारवाई करत ६२.५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये गोवा बनावटीची ४० लाखांची देशी दारू राज्य उत्पादन शुल्कच्या कागल विभागाने पकडली. ही दारू गोव्यात तयार करण्यात येत होती, पण त्यावर लेबल महाराष्ट्राचे लावून विक्रीसाठी आणली जात होती.सदर कारवाईमध्ये शंकर सीताराम आंबेकर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, प्रमोद खरत निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर भरारी पथक क्र. २ यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यामध्ये दुय्यम निरीक्षक ए. आर. नायकुडे, पी. डी. नागरगोजे, डी. बी. गवळी, सचिन काळेल, लक्ष्मण येडगे, केतन दराडे तसेच निरीक्षक गडहिंग्लज व भरारी पथक क्रमांक २ चे कर्मचारी यांनी भाग घेतला.

कागलमधील राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, देवगड–निपाणी राज्य महामार्गावरील बसवडे फाटा येथे सापळा रचण्यात आला. यावेळी एमएच -४०-सीएम -२५३५ क्रमांकाच्या टाटा मोटर्स कंपनीच्या १५१२/एलपीटी ट्रकची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये पुढील बाजूस देशी दारूचे बॉक्स आणि मागील बाजूस पिण्याच्या पाण्याचे बॉक्स आढळून आले.

तपासणीमध्ये ‘रॉकेट देशीदारू संघ’ या ब्रँडच्या एकूण १००० बॉक्स देशी दारू सापडली. प्रत्येक बॉक्समध्ये ९० मिली क्षमतेच्या १०० बाटल्या असल्याने एकूण ९ लाख दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या दारूच्या बाटल्यांवर प्रकार डिस्टिलरी प्रा. लि., राहाता, जि. अहमदनगर असा उल्लेख असला तरी प्राथमिक चौकशीत ही दारू गोवा राज्यात तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.कारवाईत दारू, पाण्याचे बॉक्स, ट्रक, मोबाईल फोन आणि कागदी बॉक्स असा एकूण ६२,५०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ट्रकची किंमत सुमारे २० लाख रुपये आहे.

या प्रकरणी ट्रक चालक सलीम खयूम शेख आणि क्लिनर सूरज तेजराव सावंत यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांविरोधात महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम 1949, भारतीय न्याय संहिता 2023 आणि ट्रेड मार्क अ‍ॅक्ट 1999 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon