अक्षय कुमारच्या कार अपघातात जखमी झालेल्या रिक्षाचालकाची तब्येत नाजूक; हात जोडून मदतीची मागणी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतील जुहू परिसरात सोमवारी रात्री अभिनेता अक्षय कुमारच्या सुरक्षा वाहनाला एका मर्सिडीज कारने धडक दिली. याप्रकरणी मर्सिडीज चालकाविरुद्ध रेस अँड ड्राइव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा अक्षयची गाडी घराबाहेर पडली तेव्हा त्याच्या सुरक्षा वाहनाच्या मागे एक ऑटो रिक्षा होती आणि ऑटो रिक्षाच्या मागे एक मर्सिडीज कार होती. मर्सिडीज कार चालकाने ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली आणि नंतर ऑटो रिक्षाने अक्षय कुमारच्या सुरक्षा कारला धडक दिली. या घटनेत रिक्षाचालक आणि प्रवासी जखमी झाले आहेत. रिक्षाचालकाच्या भावाने उपचाराच्या खर्चाच्या मदतीसाठी अक्षय कुमारकडे विनंती केली आहे.
रिक्षाचालकाचा भाऊ मोहम्मद समीरने सांगितलं की, “ही घटना सोमवारी रात्री ८ ते ८.३० च्या सुमारास झाली होती. माझा भाऊ रिक्षा चालवत होता, तेव्हा त्याच्या मागे अक्षय कुमारची इनोव्हा आणि एक मर्सिडीज होती. जेव्हा मर्सिडीजने इनोव्हाला धडक दिली, तेव्हा इनोव्हा माझ्या भावाच्या रिक्षाशी जाऊन धडकली. या अपघातात माझा भाऊ आणि दुसरा प्रवासी दुखापग्रस्त झाले. त्याच्या रिक्षाचं प्रचंड नुकसान झालं आहे. माझ्या भावाची प्रकृती गंभीर आहे. मी विनंती करतो की माझ्या भावाचे उपचार व्यवस्थित व्हावेत आणि रिक्षाचं जे नुकसान झालं, त्याची भरपाई द्यावी. आम्हाला आणखी काही नको.
पोलिसांनी सांगितले की, मर्सिडीज चालक राधेश्याम राय याच्याविरुद्ध वेगाने गाडी चालवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच पोलिसांनी ऑटो रिक्षा आणि मर्सिडीज कार दोन्ही जप्त केल्या आहेत. सोमवारी रात्री अक्षय कुमार त्याच्या कुटुंबासह घराबाहेर पडत असताना ही घटना घडली. या घटनेत अक्षय कुमार आणि त्याचे कुटुंब सुरक्षित राहिले. परंतु जर मर्सिडीज जास्त वेगाने गेली असती तर अक्षय कुमारच्या कारचंही नुकसान झालं असतं. त्यामुळे या अपघातात अक्षय थोडक्यात बचावला आहे. याप्रकरणी मर्सिडीज चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. परंतु त्याने कोणतंही मादक पदार्थ सेवन केलं नव्हतं. म्हणून त्यानंतर त्याला नोटीस देऊन सोडण्यात आलं आहे.