पुणे ग्रँड सायकल टूरमध्ये अपघात, ५० हून अधिक सायकलपटू एकमेकांवर धडकले
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुणे जिल्हा प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक मोठी घटना मंगळवारी मुळशी तालुक्यात घडली. ‘पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर’ दरम्यान मुळशी-कोळवण रस्त्यावर अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्याने सायकलपटूंचा अपघात झाला. यामध्ये ७० हून अधिक सायकलपटू एकमेकांवर आदळले असून अनेक खेळाडू जखमी झाले आहेत.
मुळशीतील कोळवण रोडवरून ही स्पर्धा जात असताना रस्त्याची रुंदी अचानक कमी झाली. ताशी ६० ते ७० किमी वेगाने धावणाऱ्या सायकलपटूंना या अरुंद रस्त्याचा आणि तीव्र वळणाचा अंदाज आला नाही. आघाडीच्या सायकलपटूचा ताबा सुटल्याने मागून येणारे खेळाडू एकापाठोपाठ एक एकमेकांवर आदळले. या साखळी अपघातामुळे अनेक खेळाडू ट्रॅक सोडून बाजूला फेकले गेले.प्राथमिक माहितीनुसार, अनेक खेळाडू किरकोळ जखमी झाले असून ४ ते ५ खेळाडूंना दुखापत झाल्याने तातडीने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तसेच साधारण १५ मिनिटांच्या ब्रेकनंतर ही रेस पुन्हा सुरु करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा आयोजित करताना जिल्हा प्रशासनाने रस्त्यांच्या स्थितीचा विचार केला नव्हता का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कोळवण रोडवरील अरुंद भागाची माहिती खेळाडूंना आधीच देण्यात आली नव्हती, असा आरोप होत आहे. वळणावर सुरक्षेसाठी आवश्यक असणारी बॅरिकेडिंग किंवा धोक्याच्या सूचना देणारे फलक कमी असल्याचे दिसून आले. तुम्ही ही सायकल स्पर्धा जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.