पनवेलमधील घरफोडीचा छडा; कुर्ल्यातून सराईत गुन्हेगार अटकेत, ७.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त
पनवेल : पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टपालनाका परिसरात घडलेल्या मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा पनवेल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुंबईतील कुर्ला परिसरातून एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी ७ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
फिर्यादी प्रमोद जोरी (रा. सचिन प्लाझा इमारत, पांजरपोळ, टपालनाका, पनवेल) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला होता. या घरफोडीत ८ लाख १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि ९० हजार रुपये रोख, असा एकूण ९ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्रे हलली. पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे यांच्यासह पोलीस हवालदार अविनाश गंथडे, योगेश दिवेकर, परेश म्हात्रे, पोलीस नाईक सम्राट डाकी, विनोद देशमुख, पोलीस शिपाई किरण कराड आदींच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा माग काढला.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कमरुद्दिन सलाउद्दीन शेख (वय ४५, रा. टॅक्सीमन कॉलनी, कुर्ला, मुंबई) याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने घरफोडीची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेल्या मालापैकी ७ लाख २२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
उर्वरित मुद्देमालाचा तसेच आरोपीच्या इतर गुन्ह्यांतील सहभागाचा तपास पनवेल पोलीस करत असून, शहरातील घरफोडीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी गस्त व तपास अधिक कडक केला आहे.