मुंबईत उभारले जाणार ‘बिहार भवन; मनसेचा विरोध तर शिंदेंच्या शिवसेनेचा पाठिंबा
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – दिल्लीनंतर आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही ‘बिहार भवन’ उभारले जाणार आहे. बिहार सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सविस्तर आखणी पूर्ण केली असून, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एलफिन्स्टन इस्टेट परिसरात या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. या प्रकल्पाला राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत ३१४.२० कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. बिहारहून मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र निवासव्यवस्था करण्यासाठी या बिहार भवनचा उपयोग केला जाणार असल्याचं सांगण्यात येतंय. कर्करोगासह अन्य गंभीर आजारांच्या उपचारासाठी मुंबईत येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी २४० बेड असलेल्या क्षमतेचे डॉर्मिटरी उभारले जाणार असून, त्यामुळे त्यांना सुरक्षित, परवडणारा आणि सुलभ निवासाचा दिलासा मिळेल, असं बिहार सरकारकडून हा निर्णय घेतल्यानंतर सांगितलं जातंय.
प्रस्तावित बिहार भवन बेसमेंटसह सुमारे ३० मजली असणार असून, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल. जमिनीपासून सुमारे ६९ मीटर उंचीची ही इमारत अंदाजे ०.६८ एकर भूखंडावर उभारली जाणार आहे. या इमारतीत एकूण १७८ खोल्या असतील. या खोल्यांचा उपयोग सरकारी अधिकारी, पाहुणे तसेच गरजू नागरिकांसाठी करण्यात येणार आहे. या इमारतीत शासकीय बैठका आणि कार्यक्रमांसाठी ७२ लोकांच्या क्षमतेचा आधुनिक परिषद कक्ष असेल. यासोबतच कॅफेटेरिया, वैद्यकीय कक्ष तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वाहनतळाची अडचण लक्षात घेऊन सेन्सरवर आधारित स्मार्ट ट्रिपल आणि डबल डेकर पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यात एकावेळी २३३ गाड्यांची व्यवस्था असेल.
बिहार सरकारच्या बांधकाम विभागाचे सचिव कुमार रवी यांनी सांगितले की, “मुंबईतील बिहार भवन हा राज्याच्या प्रगती आणि जनकल्याणाच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. एकीकडे शासकीय कामकाज अधिक सुकर होईल, तर दुसरीकडे उपचारासाठी मुंबईत येणाऱ्या हजारो बिहारी नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. हा प्रकल्प बिहार सरकारची सामाजिक बांधिलकी आणि आधुनिक विकासदृष्टी अधोरेखित करणारा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत ‘मराठी माणसाचा’ मुद्दा केंद्रस्थानी राहिलाय. परराज्यातून मुंबईत नोकरीसाठी येणाऱ्या लोंढ्याबाबतचा मुद्दा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अनेकदा मांडलाय. राज्य सरकारकडून अद्याप याबाबत कोणी बोललं नसलं तरी आम्ही हे बिहार भवन मुंबईत बनू देणार नाही, अशी भूमिका मनसेने घेतलीय. दादरमधून निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी याबाबत म्हटलंय की, “काहीही झालं तरी आम्ही हे बिहार भवन बनवू देणार नाही. इथे आमच्या मराठी माणसाचे अनेक प्रश्न आहेत. तुमचे प्रश्न तुम्ही तुमच्या राज्यात सोडवा ना. आमच्यावर भार कशासाठी? रुग्णांसाठी हॉस्पिटल बांधा. ते उपचारांसाठी मुंबईत येतात म्हणून इथे बिहार भवन बांधण्यापेक्षा तुमच्या राज्यात चांगली हॉस्पिटल बांधा. आम्ही हे बिहार भवन होऊ देणार नाही.
मनसेने बिहार भवन होऊ नये, असं म्हटलं असलं तरी रुग्णांच्या व्यवस्थेसाठी हे भवन बांधण्यात येत आहे. त्यामुळे याला विरोध करणे चुकीचे असल्याचे शिवसेना (शिंदे) नेते संजय निरुपम यांनी म्हटले आहे. ते म्हणतात, “मुंबई यूपी भवन बांधलेले आहे. मग बिहार भवनची काय अडचण आहे? प्रत्येक राज्याची एकमेकांशी बांधिलकी असणं गरजेचं आहे. त्यामुळे देशाची प्रगती होत असते. बिहारमधून मोठ्या संख्येने कॅन्सरचे रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यांची व्यवस्था करण्यात काय चूक आहे? मला वाटतं मुंबईत सर्व राज्यांचे भवन उभारण्यात यावेत, जेणेकरून बाहेरच्या राज्यातून आलेल्या लोकांना दिलासा मिळेल.