मुंबईतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये ‘भूकंप’; वर्षा गायकवाडांच्या राजीनाम्याची मागणी, भाई जगतापांना कारणे दाखवा नोटीस

Spread the love

मुंबईतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये ‘भूकंप’; वर्षा गायकवाडांच्या राजीनाम्याची मागणी, भाई जगतापांना कारणे दाखवा नोटीस

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूक निकालांनंतर सत्तासमीकरण स्पष्ट झाले असून भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागांवर आघाडी घेत राज्यातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून आपले स्थान भक्कम केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना दुसऱ्या, तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत अस्वस्थता उफाळून आली असून त्याचे पडसाद थेट पक्षांतर्गत कारवाईत उमटले आहेत.

आकडेवारीनुसार भाजपला ९१० जागांवर आघाडी मिळाली असून शिंदे गटाच्या शिवसेनेला २१३ आणि काँग्रेसला १७१ जागांवर आघाडी आहे. राज्यपातळीवर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर असली, तरी मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांतील कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीबरोबर युती करून लढत दिली; मात्र पक्षाला केवळ २४ जागांवर समाधान मानावे लागले.

या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी जाहीर मागणी विधान परिषद सदस्य भाई जगताप यांनी केली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या २४ तासांतच ही मागणी सार्वजनिकरित्या केल्याने पक्ष नेतृत्वाने कठोर भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे सचिव व मुंबई प्रभारी यू. व्ही. व्यंकटेश यांनी जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून सात दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद उघडकीस आले आहेत.

ठाणे महापालिका निवडणुकीतही काँग्रेससाठी चित्र निराशाजनक ठरले. महाविकास आघाडीतून बाहेर पडत स्वबळावर निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेसचा येथे मोठा पराभव झाला. पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनाही पराभव स्वीकारावा लागला. या निकालाची जबाबदारी स्वीकारत चव्हाण यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणाही केली आहे.

ठाणे महापालिकेत शिंदे गटाच्या शिवसेनेने ७५, भाजपने २८, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ९, एमआयएम ५, शिवसेना (उबाठा) १ आणि अपक्ष १ अशा एकूण १३१ जागा जिंकल्या. या निवडणुकीत काँग्रेस तसेच महाविकास आघाडीतून लढलेल्या मनसेचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. विशेष म्हणजे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे या दोघांचाही पराभव झाला.

मोठ्या शहरांतील अपयशाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची एकूण आकडेवारीत मुंबईचा वाटा जवळपास नगण्य ठरला आहे. मुंबई आणि पुण्यात काँग्रेसला केवळ प्रत्येकी पाच जागांवरच आघाडी मिळाली आहे. पिंपरी-चिंचवड, वसई-विरार, उल्हासनगर, नांदेड-वाघाळा, जळगाव, अहिल्यानगर, धुळे आणि कल्याण-डोंबिवली या महत्त्वाच्या महापालिकांत काँग्रेसचे खातेही उघडले नाही. मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यात काँग्रेस फक्त दोन जागांवर आघाडीवर असून नवी मुंबईत पक्षाला एकही जागा मिळालेली नाही.

मात्र, सर्वत्र निराशा असतानाही काही महापालिकांत काँग्रेसने प्रभावी उपस्थिती दाखवली आहे. लातूरमध्ये २१ वॉर्डांमध्ये आघाडी घेत काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. अमरावतीत १३, चंद्रपुरात १२ आणि भिवंडी-निजामपूरमध्येही १२ वॉर्डांमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. नागपूर (२२), कोल्हापूर (२३) आणि अकोला (१५) येथे काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर मजबूत स्थितीत आहे.

एकूणच, या निवडणूक निकालांनी भाजपचे राज्यव्यापी वर्चस्व अधोरेखित केले असले, तरी काँग्रेसची काही महापालिकांतील कामगिरी आणि अंतर्गत घडामोडी आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करणाऱ्या ठरणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon