खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत २० लाखांची खंडणी; श्रीगोंद्यातील टोळी जेरबंद
पोलीस महानगर नेटवर्क
अहिल्यानगर : खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा श्रीगोंदा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे ५४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी वैभव आसाराम खेंडके (वय २७, रा. श्रीगोंदा) यांनी तक्रार दिली आहे. १ जानेवारीपासून अज्ञात मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअॅपवर धमकीचे संदेश येत होते. आरोपींकडे वैभव यांचे काही खासगी फोटो असून, ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. बदनामीच्या भीतीपोटी वैभव यांनी सुरुवातीला १ लाख ५० हजार रुपये दिले. मात्र त्यानंतर आरोपींनी उर्वरित रकमेच्या मागणीसाठी वैभव तसेच त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण शिंदे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक तपास करत आरोपींचा माग काढण्यात आला. सापळा रचून आकाश पोपट मोरे, बापू विठ्ठल शिंदे आणि किरण विठ्ठल शिंदे (सर्व रा. श्रीगोंदा परिसर) यांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले तीन मोबाईल फोन आणि तीन आलिशान चारचाकी वाहने असा एकूण ५४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस व सायबर सेलच्या पथकाने केली.
या घटनेमुळे सोशल मीडियाच्या गैरवापरातून वाढणाऱ्या खंडणीच्या गुन्ह्यांबाबत पुन्हा एकदा गंभीर चिंता व्यक्त होत आहे.