ठाण्याचा ‘ढाण्या’ वाघ मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंची शाबासकी
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना ठाणे महापालिकेतील एक निकाल विशेष लक्षवेधी ठरला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या ठाण्यात, शिंदे स्वतः राहतात त्या प्रभागात त्यांच्या गटाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
प्रभाग क्रमांक १३ मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या शहाजी खुस्पे यांनी शिंदे गटाचे माजी महापौर आणि पाच वेळा नगरसेवक राहिलेले अशोक वैती यांचा पराभव केला. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून वैती यांचे या प्रभागावर प्राबल्य होते. काजूवाडी, वैतीवाडी, रामचंद्र नगर, साईनाथ नगर, ज्ञानेश्वर नगर या भागांचा समावेश असलेल्या या प्रभागात हा निकाल ‘चक्रावणारा’ मानला जात आहे.
या विजयानंतर शहाजी खुस्पे यांनी रविवारी ‘मातोश्री’वर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनी खुस्पे यांची विचारपूस करत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. “निष्ठेची ही लढाई यापुढेही अशीच लढत राहा; आता थांबायचं नाही,” असा संदेश ठाकरे यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. खुस्पे यांच्या विजयी रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली, तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मानही करण्यात आला.
अशोक वैती हे ठाण्याचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे. माजी महापौर, माजी सभागृह नेते आणि शहरप्रमुख असा प्रदीर्घ राजकीय अनुभव असतानाही त्यांचा पराभव झाल्याने हा विजय ठाकरे गटासाठी संघटनात्मक बळ देणारा ठरतो आहे.
या प्रभागात शिवसेनेच्या पॅनलला कडवी झुंज देणारे संजय दळवी, वैशाली घाटवळ, अनिला हिंगे आणि अमोल हिंगे यांचेही उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. ठाण्यातील हा निकाल आगामी राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारा ठरेल, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.