मणिकर्णिका’ प्रकरणी खासदारासह आठ जणांविरुद्ध गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
वाराणसी : येथील ऐतिहासिक मणिकर्णिका घाटाच्या पुनर्विकास कामासंदर्भात समाजमाध्यमांवर टीका करणाऱ्या आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, काँग्रेस नेते पप्पू यादव यांच्यासह आठ जणांविरुद्ध उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी एकूण आठ एफआयआर नोंदवण्यात आल्या असून, एआय-निर्मित प्रतिमा, व्हिडीओ तसेच दिशाभूल करणारी माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याचा आरोप संबंधितांवर ठेवण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, मणिकर्णिका घाटाच्या पुनर्विकास कामाबाबत काही व्यक्तींनी सोशल मीडियावर व्हायरल केलेली सामग्री वास्तवाशी विसंगत असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. या पोस्टमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होण्याची तसेच सार्वजनिक शांततेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
दरम्यान, या कारवाईवरून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सत्ताधारी पक्षाकडून कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही कारवाई आवश्यक असल्याचे सांगितले जात असताना, विरोधकांनी मात्र ही कारवाई अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, संबंधित समाजमाध्यम पोस्ट्स आणि डिजिटल सामग्रीची तांत्रिक तपासणी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.