शिवसेनेचे माजी महापौर विकास जैन यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल

Spread the love

शिवसेनेचे माजी महापौर विकास जैन यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या गोंधळाप्रकरणी शिवसेनेचे माजी महापौर विकास जैन यांच्यासह शिवा राजपूत व अभिषेक जीवनवाल यांच्याविरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीपी सागर देशमुख यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

शुक्रवारी (दि. १६) उस्मानपुरा येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मनपा प्रभाग क्रमांक १८ ते २२ आणि २७ ची मतमोजणी सुरू होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार केवळ अधिकृत ओळखपत्र असलेल्या उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनाच प्रवेश देण्यात येत होता. त्या अनुषंगाने ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात होता.

सकाळी ९ ते ९.३० दरम्यान विकास जैन, शिवा राजपूत व अभिषेक जीवनवाल मुख्य प्रवेशद्वारावर आले. बंदोबस्तावर असलेले पोलिस निरीक्षक प्रमोद कठाणे यांनी ओळखपत्र दाखवण्याची विनंती केली असता, जैन यांनी ओळखपत्र न दाखवता पोलिसांशी वाद घातल्याचे तक्रारीत नमूद आहे. परिस्थिती शांत करण्यासाठी सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख पुढे आले असता, जैन यांनी त्यांच्या अंगावर धावून जात गळा पकडून ढकलल्याचा आरोप आहे. या गोंधळात राजपूत व जीवनवाल यांनीही गेट ढकलून आत प्रवेश केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

या घटनेनंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यात तिघेही जखमी झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, पालकमंत्री अतुल शिरसाठ यांनी घटनेबाबत पोलिस आयुक्तांकडे जाब विचारत नाराजी व्यक्त केली होती. आयुक्तांनी चौकशीचे आश्वासन दिले असतानाच रात्री उशिरा संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास वेदांतनगर पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon