काशिमिरा बेकरी गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी ‘पप्पू पेजर’ विमानतळावर अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
वसई : काशिमिरा येथील इंटरनॅशनल बेकरी गोळीबार प्रकरणातील मुख्य फरार आरोपी अहमद फजल अहमद शेख उर्फ ‘पप्पू पेजर’ याला गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. गेल्या दोन वर्षांपासून तो परदेशात फरार होता.
मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी ११ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे उतरणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.
१३ ऑक्टोबर २०२३ रोजी काशिमिरा येथील इंटरनॅशनल बेकरीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तूल रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पिस्तुलातून गोळी सुटली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. या प्रकरणी काशिमिरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान हा गुन्हा संघटित गुन्हेगारी टोळीने केल्याचे समोर आल्यानंतर प्रकरणात महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ऍक्ट अंतर्गत कलमेही लावण्यात आली होती. यापूर्वी या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली होती, तर मुख्य आरोपी फरार होता.
दरम्यान, आरोपीविरुद्ध वडाळा पोलीस स्टेशन आणि भायखळा पोलीस स्टेशन येथेही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला २० मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.