सलग तीन दिवस ‘ड्राय डे’; महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मद्यविक्री बंद
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर राज्यात सलग तीन दिवस ‘ड्राय डे’ जाहीर करण्यात आला आहे. मतदानाच्या आधीचा दिवस १४ जानेवारी, मतदानाचा दिवस १५ जानेवारी आणि मतमोजणीचा दिवस १६ जानेवारी या कालावधीत राज्यभरातील मद्यविक्रीची दुकाने, बार व परमिट रूम बंद राहणार आहेत.
महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात असून मंगळवार, १३ जानेवारी रोजी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच मतदारांना आमिष दाखवण्यासाठी मद्याचा वापर होऊ नये, यासाठी निवडणूक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मतदान व मतमोजणीच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यावरही कडक बंदी असणार आहे.
मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी मतमोजणी होईल. यंदाची निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत. महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. दुसरीकडे, भाजपकडून मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, या उद्देशाने १४ ते १६ जानेवारीदरम्यान राज्यभर ‘ड्राय डे’ लागू करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.