प्रचाराची सांगता होताच रिक्षातून ५० लाखांची रोकड जप्त; उल्हासनगरमध्ये खळबळ

Spread the love

प्रचाराची सांगता होताच रिक्षातून ५० लाखांची रोकड जप्त; उल्हासनगरमध्ये खळबळ

पोलीस महानगर नेटवर्क

उल्हासनगर : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या प्रचाराची अधिकृत सांगता झाली असतानाच उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्याने खळबळ उडाली आहे. सुभाष टेकडी चौकात भरारी पथकाने एका रिक्षातून तब्बल ५० लाख रुपयांची रोकड जप्त केली. ही रक्कम अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांच्या सतर्कतेमुळे पकडली गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रचाराची सांगता झाल्यानंतर उमेदवारांना घराघरांत भेटी देण्यास परवानगी असली, तरी प्रचार साहित्य वाटपास मनाई आहे. अशा पार्श्वभूमीवर पैशांची हालचाल उघडकीस आल्याने निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाचा संशय बळावला आहे. दोन दिवसांपूर्वी डोंबिवलीत मतदारांना पाकिटांतून पैसे पाठवले जात असल्याचा प्रकार समोर आला होता; त्यानंतर हा दुसरा मोठा प्रकार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नरेश गायकवाड यांनी दुचाकीवरून पाठलाग करून संबंधित रिक्षा थांबवली. रिक्षात ठेवलेल्या बॅगेत मोठी रोकड आढळल्यानंतर प्रकरण भरारी पथक आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रिक्षा चालकासह रोकड असलेली बॅग विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आली आहे.

दरम्यान, या रकमेचा संबंध भाजपचे उमेदवार प्रदीप रामचंदानी यांच्या कार्यालयाशी असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. मात्र, या आरोपांची सत्यता तपासण्याचे काम निवडणूक आयोग व पोलिसांकडून सुरू आहे. बॅगेतील नोटा मोजण्यासाठी पोलीस ठाण्यात नोटा मोजण्याचे यंत्र मागवण्यात आले असून बंद खोलीत पंचनामा करून मोजणी करण्यात येत आहे.

एवढ्या मोठ्या रकमेचा नेमका उद्देश काय होता आणि ती कुणासाठी नेली जात होती, याचा तपास सुरू असून पुढील कारवाई अहवालानंतर ठरवली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon