अंबरनाथ रेल्वे स्थानकात लोकलच्या डब्यातच महिलेने बाळाला दिला जन्म

Spread the love

अंबरनाथ रेल्वे स्थानकात लोकलच्या डब्यातच महिलेने बाळाला दिला जन्म

योगेश पांडे / वार्ताहर

कल्याण – अंबरनाथ रेल्वे स्थानकात लोकलच्या डब्यातच महिलेने बाळाला जन्म दिला आहे. शनिवारी रात्री कल्याण ते अंबरनाथ असा प्रवास करताना अचानकपणे महिलेला प्रसूतीकळा सुरु झाल्या. महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. लोकल अंबरनाथ स्थानकात पोहचताच प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली. तात्काळ रेल्वेच्या ऑन ड्यूटी महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली नन्देश्वर यांनी परिस्थितीच गांभीर्य ओळखले. त्यांनी लोकलमध्येच महिलेच्या प्रसूतीची तयारी केली.

लोकलच्या डब्यातून सर्व पुरुष प्रवाशांना उतरवून दरवाजे बंद करण्यात आले. अखेर लोकलच्या डब्यातच या महिलेची सुरक्षित प्रसूती झाली. महिलेच्या प्रसूतीकळांनी धीरगंभीर झालेल्या प्रवाशांना बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. या महिलेने एका गोंडस कन्येला जन्म दिला. अंबरनाथमध्ये राहणारी अंजू काळे ही २३ वर्षीय गर्भवती महिला काही कामानिमित्त कल्याणला गेली होती. त्यानंतर परतीचा प्रवास करताना तिची प्रसूती झाली.

कल्याणहून लोकलने अंबरनाथला परत येत असताना या महिलेला अचानक लोकलमध्ये प्रसूती वेदना होऊ लागल्या. शनिवारी रात्री ८ वाजून ५ मिनिटानी ही लोकल अंबरनाथ स्थानकात दाखल होताच काही प्रवाशांनी तत्काळ आरपीएफ कार्यालयात धाव घेऊन याबाबतची माहिती दिली. महिला पोलिस उपनिरीक्षक सोनाली नन्देश्वर यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे व धाडसामुळे लोकल डब्यातच या महिलेची सुरक्षित प्रसूती झाली. महिला पोलीस उपनिरीक्षक नन्देश्वर यांनी दाखवलेल्या या समयसूचकतेच प्रवाशांकडून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon