मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेत मोठा राजकीय राडा!
भाजप अन् मनसे कार्यकर्ते एकमेकांना भिडले; एक जण जखमी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राज्यातील महापालिका निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून मुंबई महापालिकेकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे, एकीकडे ठाकरे बंधू प्रत्यक्ष मैदानात उतरून जोरदार प्रचार आणि सभांचं नियोजन करताना दिसतायत. तर दुसरीकडे महायुती, महाविकास आघाडी आणि इतर प्रमुख पक्षही मोर्चे बांधणी करत असल्याचे चित्र आहे. त्यात आता पक्षाची धुरा संभाळणारे कार्यकर्तेही आता जोमाने कामाला लागले आहे. दरम्यान मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. गोरेगाव पश्चिमेच्या प्रभाग नंबर ५८ मध्ये भाजप आणि मनसेमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली. गोरेगाव पश्चिमेत अमृत नगर भागात प्रचाराचे टेबल लावण्यावरून भाजप आणि मनसेमध्ये राडा झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले. या हाणामारीमध्ये मनसेच्या एक कार्यकर्ता जखमी झाल्याची माहिती आहे. तर घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणले. मात्र या राड्यामुळे गोरेगाव परिसरात राजकीय तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र ही घटना नेमकी कशामुळे घडली, त्यासोबत किती जण दोन्ही बाजूने जखमी आहेत, या संदर्भात गोरेगाव पोलीस तपास करत आहे. दरम्यान गुन्हा दाखल करून पुढील तपास केला जात आहे.