गुन्हा मागे घेण्यासाठी १५ लाखांची खंडणी; दोन महिला व एका पुरुषास रंगेहात अटक
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : पोलिसावर दाखल असलेला गुन्हा मागे घेण्यासाठी तब्बल १५ लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना दोन महिला आणि एका पुरुषास जोडभावी पेठ पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली.
पूजा ढवळे (वय ३७, रा. शिवगंगा नगर), मिलिंद कांबळे (वय ४७, रा. बुधवार पेठ) आणि लक्ष्मी लोंढे (वय ४५, रा. एसआरपीएफ कॅम्पजवळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी जितेंद्र रामहारी भोसले (वय ४२, रा. पंचरत्न निवास, नेताजी नगर, जोडभावी पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोसले यांच्यावर यापूर्वी एक गुन्हा दाखल असून तो मागे घेण्यासाठी आरोपींनी १५ लाख रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी शुक्रवारी सकाळी आरोपींनी भोसले यांना एम्प्लॉयमेंट चौकातील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. याची माहिती मिळताच भोसले यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीची खात्री करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड यांनी दोन पंचांसह पथक तैनात करून हॉटेल परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे भोसले यांनी आरोपींना ५० हजार रुपये रोख तसेच दीड लाख आणि १३ लाख रुपयांचे असे दोन धनादेश दिले. रक्कम स्वीकारताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रोख रक्कम आणि धनादेशांसह तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०८ (२), ३५१ (३)(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जोडभावी पेठ पोलीस करीत आहेत.