प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस? डोंबिवलीत भाजपवर आरोप, शिंदे गटाकडून ‘रंगेहाथ’ पकडल्याचा दावा
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : डोंबिवलीत सुरू असलेल्या निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांना थेट रोख रक्कम वाटप केल्याचा गंभीर आरोप भाजपवर करण्यात आला आहे. शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना रंगेहाथ पकडल्याचा दावा केला असून, या प्रकरणाची दखल घेत निवडणूक आयोगाने चौकशी सुरू केली आहे.
डोंबिवलीतील तुकाराम नगर परिसरातील दशरथ भुवन भागात भाजपकडून नागरिकांच्या घरी प्रत्येकी तीन हजार रुपयांची पाकिटे वाटली जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. प्रचाराच्या नावाखाली मतदारांना प्रलोभन देण्याचा हा प्रकार असल्याचा दावा करत शिवसेना कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील यांच्यासह कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. पैसे वाटप करणाऱ्या व्यक्तींना रंगेहाथ पकडल्याचा दावा करत त्यांनी तात्काळ निवडणूक प्रशासनाला याची माहिती दिली.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन निवडणूक आयोगाचे पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असून, ही रक्कम कोणी, कुणाच्या सांगण्यावरून आणि कोणत्या उद्देशाने वाटप केली, याचा तपास करण्यात येत आहे. चौकशीअंती दोषी आढळल्यास निवडणूक आचारसंहितेनुसार कडक कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.